• 4
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  4
  Shares

IMG-20200511-WA0012-0.jpg IMG-20200511-WA0008-1.jpg IMG-20200511-WA0011-2.jpg

निसर्गाने तुम्हा-आम्हाला भरभरून दिले आहे. आपली घेण्याची कुवत संपेल परंतु निसर्गाचे हात रिते होणार नाहीत. हिरवेगार डोंगर झाडे, वेली, पशु, पक्षी काय काय बघावे आणि कितीदा बघावे. निसर्ग सौंदर्य बघून डोळ्याचे पारणे फिटते पण वारंवार पहात रहावे, डोळ्यात, मनात साठवत ते सौंदर्य हृदयात जतन करत जावे असे वाटत असते.


मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा कडाका जाणवायला लागतो. घराच्या बाहेर पडताच ‘सळो की पळो’ करून सोडणारी सूर्याची जीवघेणी किरणे नको नको वाटायला लागतात. सूर्यप्रकाशात सहज जरी समोर बघायचे म्हटले, तरी डोळ्यांना कमालीची हिम्मत दाखवावी लागते.

अशावेळी आपल्या आजूबाजूला असणारी ही सप्तरंगी फुले डोळ्यांना, मनाला आणि शरीरालासुद्धा अल्हाददायक शांतता देतात त्यामुळेच हा ऋतूदेखील इतर ऋतूंएवढाच खास वाटू लागतो. सध्या हे काम पार पडण्यात बोगनवेल, बहावा, पांढरा चाफा, पळस, पांगिरा ही फुलं अग्रेसर आहेत म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही.


वसंत ऋतूची चाहूल लागताच ठराविक झाडांची पानगळ होते आणि पानोपानी फुलांचा बहर दिसू लागतो. झाडांची जुनी पाने गळून नवीन हिरवीगार पालवी फुटू लागते. काही झाडांना फुलांचा बहर येऊ लागतो. ही नवीन आलेली हिरवी-तांबूस-सोनेरी पालवी आणि वसंतात फुललेल्या फुलांचे विविध रंग या काळात अतिशय गडद आणि मनाला तजेला देणारे असतात. म्हणजेच ग्रीष्माच्या दाहकतेला शीतल करण्याचे काम वसंत ऋतूच करू शकतो हे भासवून निसर्ग जणू आपल्यावर चहूबाजूंनी रंगांची उधळणच करत असतो.


हे घडत असतानाच सर्वांचे मन वेधणारा आणि आवडीचा असा विलोभनीय ऋतू म्हणजे पावसाळा आपल्यात सामिल होतो. पावसाळ्यात आपल्या सभोवतालचे वातावरण अगदी हिरवेगार होऊन गेलेले दिसते ना. तसच काही भागांमध्ये चांगला पाऊस होत असतो, तर काही भाग मात्र नेहमी कोरडेच आसतात. परंतु निसर्गाचा अस्सल अनुभव घेण्यासाठी मात्र पावसाळ्यासारखा मोसम नाही. अनेक प्रकारच्या नावीन्यपूर्ण गोष्टी याच मोसमाच्या सुरुवातीस घडत असतात आणि त्यांमध्ये सातत्याने बदल देखील होतात.


अगदी सहजच एक प्रश्न विचारतो, प्रारंभीस पहिल्या जोरदार पावसानंतर आलेली काही छोटीछोटीशी झाडे आपण पाहिली आहेत का? खरं तर या छोट्या झाडांमध्येही फार भिन्नभिन्न व वैशिष्ट्यपूर्ण झाडे पाहायला मिळतात.

साधारणत: पावसाळा सुरू झाला की पहिल्या १० ते १२ दिवसांमध्ये छोटीछोटी झाडे उगवून येतात. परंतु या झाडांचे आयुष्य फार थोडे असते, केवळ २०-३० दिवसच ही झाडे जगतात. जसजसा पावसाचा जोर वाढतो तसतशी वेगवेगळी झाडे उगविण्यास सुरुवात होते. साधारणपणे जुलै महिन्यामध्ये पावसाचा जोर मोठा असतो.

दुर्दैवाने या वर्षी मात्र वातावरणातील भयानक बदल लक्षात घेता सर्वच ऋतूंची हेळना झाल्याने झाडांची देखील जीवनशैली विस्कटलेली दिसते. परंतु किती प्रकारची छोटी झाडे नव्याने उगवून येत आहेत, हे पाहण्यास आपल्याला हरकत नाही.


ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा जोर कमी होतो व ही सर्व झाडे फुलावर येण्यास सुरुवात होते. ऑक्टोबर अखेरपर्यंत सर्व झाडे आपला जीवनकाळ संपवून पुढील वर्षांच्या पावसाची वाट बघत असतात.

आपण कधी विचार केलाय का हो, की ज्या छोट्या झाडांचे आयुष्य चार महिन्यांमध्ये संपून जाते, ती झाडे पुन्हा पुढच्या वर्षी कशी उगवून येत असतील? त्यांनी तयार केलेल्या बिया कशा पद्धतीने दूरवर जात असतील? खरे तर यासाठी आपण हे चार महिने आपली कामे सांभाळून अगदी बारकाईने या छोट्या झाडांचे अलगदपणे निरीक्षण केले पाहिजे. यासाठी आपण सर्व एक छोटासा प्रयोग करून पाहूया का?


आपल्या परिसरात असलेल्या कोणत्याही शेताच्या बांधाचे निरीक्षण करा. यामध्ये आपणास मोठ्या प्रमाणात गवत उगवून आलेले आढळून येईल. याचबरोबर अगदी छोटीछोटी पांढऱ्या किंवा गुलाबी किंवा निळसर रंगाची झाक असलेली फुले फुललेली दिसतील.

डोंगरउताराचा भाग असेल तर या डोंगरउतारावरील गवतांमध्येही अशी फुले डुलताना दिसतात. अर्थात, ही फुले अगदी छोटी असल्याने आपण कधी त्याकडे बारकाईने लक्ष घालतच नाही. त्यामुळे त्यांची वैशिष्ट्ये आपल्या सहज लक्षात येत नाहीत.


खरे तर या प्रत्येक छोट्या छोट्या झाडांचे स्वत:चे असे वैशिष्ट्य असते. तेरड्याची झाडे तुम्ही कधी पाहिली आहेत का? विशेषत: श्रावण महिन्यात ही तेरड्याची फुले अगदी तरारून येतात. या झाडांची फळे आकाराने नारळासारखी, पण अगदी छोटी असतात.

ही फळे तयार झाल्यावर आपण त्याला अगदी जरादेखील धक्का लावला, तर एक छोटासा आवाज येऊन फुगा फुटावा तसे हे फळ फुटते व त्यातील बिया पसरल्या जातात. गंमत म्हणून जरी आपण हे करून पाहिले तरी हे आपल्या सहज लक्षात येईल. अजून एक गंमत म्हणजे, या दिवसांमध्ये काही फळांना काटेरी बिया लागतात.

या बिया अनेक वेळा आपल्या कपड्यांना चिकटून बसतात. तुम्ही अशा काटेरी बियांचे नीट निरीक्षण करून बघा. त्यातील अनेक वेगवेगळ्या बाबी दिसून येतील. तरी या पावसाळ्यात पावसाच्या सुरुवातीस येणारी व नंतर येणारी झाडांची माहिती गोळा करा व त्यांच्या फुलांच्या व फळांच्या विविधतेचा अभ्यास करा.


आश्विन महिना सरत आला की, वतावरणात गारवा जाणवू लागतो. हळू हळू थंडीच्या लाटा जोर धरू लागतात व हिवाळा ऋतूचे राज्य सुरू होते. ओलसर पावसाळा, दाहक उन्हाळा यापेक्षा गोड गुलाबी थंडीचा हिवाळा त्याच्या गुणवैशिष्ट्यामुळे सगळ्यांनाच आवडतो. लोभसवाणा वाटतो व प्रसन्नमय भासतो.

हिवाळ्यात निसर्ग सौंदर्याने सृष्टी खुलते. एरवी नकोनकोसे वाटणारे ऊन त्याच्या उबदारपणामुळे हवेहवेसे वाटू लागते. कोवळे उन्हे अंगावर घेण्यासाठी जो तो आतुर होतो. गरम कपड्यातील उबदारपणा शरीरास सुखावतो.

हिवाळ्यात दुपारच्या सावल्या मोठय़ा व घनदाट पडतात. संध्या समयी अंधाऱ्या सावल्या लवकर पसरतात. थंडीचा कडाका, रात्रीचा गारवा, विलोभनीय धुक्याचा झिरझिरीत विस्तीर्ण पर दवबिंदूचा ओलावा आकाशाचे बदलते रंग या निसर्ग चमत्काराने चित्तवृत्ती खुलतात.


हिवाळ्यापूर्वी समाधानकारक पाऊस झाला असेल तर थंडीच्या मोसमात सृष्टी सौंदर्याला झळाळी पोचते. खळाळत्या नद्या, विहिरी पाण्याने तुडुंब भरलेला तलाव, खट्याळ निर्झर हिरवी वृक्षराजी, पिवळी धमक गेंडेदार झेंडूची शेतं, सुगंधी रंगीबेरंगी ताटवे शेवंती, पारिजातकाचा बहर, ऊस, बोरं, आवळा, हरभरा, गाजर, संत्री, मोसंबी अशी आस्वादक फळे, हिरवा भाजीपाला यांच्या लयलुटीने तसेच सुक्या मेव्याच्या लाडवांनी खवय्यांची चंगळ होते. या दिवसातील पानगळतीने त्यांची जागा घेणारी टवटवीत कोवळी नवीन पालवी येते. हे वैश्विक सत्य हिवाळा सिद्ध करून जातो.


चि. प्रणव भागवत सहाणे (M.Sc. Botany) – अकोले, ता.अकोले, जि.अहमदनगर

 •  
  4
  Shares
 • 4
 •  
 •  

Leave a Reply

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

farmbook will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.